‘असणं’ हा एक खूप सामर्थ्यशाली शब्द आहे. ज्यांना त्याचा खरा अर्थ कळत नाही, त्यांच्यासाठी तो भयंकर आणि भीतीदायक आहे. ज्यांना त्याचं सार कळत नाही अशांच्या अहंकाराला तो आव्हान देतो. हा एक असा ताकदवान शब्द आहे जो अख्खी संस्कृती उध्वस्त करू शकतो, रिती-रिवाजांची रचना तोडून टाकू शकतो आणि एखाद्या सभ्यतेपेक्षा मोठं काहीहि असू शकत नाही, हा ठाम समज खोडून काढू शकतो. हा असा शक्तिशाली शब्द आहे ज्यानी वेळोवेळी या सुसंस्कृत जगाला त्याच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःची अशी हक्काची फक्त एक जागा मागत घाबरवलं आहे. जी जागा तार्कीकदृष्ट्या नाकारणारं संविधान कोणत्याही कायद्यामध्ये, लोकशाहीमध्ये अथवा तानाशाहीमध्ये असू शकत नाही.
‘असणं’ ही अशी गोष्ट आहे जी हे जग कधीच समजून घेऊ शकलेलं नाही. असणं म्हणजे मनाची स्वतःसाठी आणि स्वतः निर्माण केलेली अशी अवस्था आहे ज्यात आपला स्व आजूबाजूच्या जगाच्या संपर्कातून संपूर्णपणे तुटतो आणि अंतर्भूत होऊन फक्त मनन करत राहतो. ‘असणं’ म्हणजे ती वेळ जेव्हा माणसाला स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांसाठी या जगाच्या आदर्शांवर हल्ला चढवावा लागतो. असणं म्हणजे ती वेळ जेव्हा माणसाला समाजातील रुढींच्या तुरुंगातून मुक्त होऊन स्वतःला ओळखावं लागतं आणि अनेक दडपणांच्या गोंधळामध्ये त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागते.
आपण जे निर्माण केलं आहे त्यासाठी आपणच आपले अपराधी आहोत हे मान्य करणं सोपं नाही. त्या साठी खूप हिंमत हवी. आपण आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम तयार केले ज्यातून प्रत्येकाला या प्रगतीशील सभ्यतेप्रती काही कर्तव्यं दिली गेली. पण या सगळ्यातून नंतर असंच आढळून आलं की या नियम आणि कर्तव्यांमुळे याच सोयीस्कर (सोयीस्कर रित्या बदलणाऱ्या) समाजामध्ये आपल्या ‘असण्याचा’ हक्क नकळतपणे आपल्यापासून हिरावला गेला. आपण जे काही निर्माण केलं आहे त्यासाठी आपणच जबाबदार आहोत आणि हे करण्याच्या नादात आपण स्वतःचा मूळ स्वभाव नष्ट करत गेलो आहोत. माणूस हा काही यंत्रमानव नाही ज्याला सूचना देऊन एखाद्या ठराविक आराखड्याप्रमाणे चालवलं जाऊ शकतं. तो जन्मापासून स्वतंत्र असतो ज्याला नंतर पालक संमोहित करतात, समाज दाबून टाकतो, रिती-रीवाज त्याचं शोषण करतात आणि अखेर धर्म त्याला गुलाम बनवतो.
समाज ही एक सवय आहे. एक अशी सवय जी बदलण्याची कोणालाही इच्छा नाही. एक अशी सवय जिची लस तुमच्या सावध परवानगीशिवाय तुम्हाला दिली गेली आहे. तुमच्या निरागसतेमध्ये समाजानी त्याचे नियम रुजवले आणि अशा अनेक कारणांना, उगमांना आकार दिला जी तुमच्या विचारप्रक्रियेला जबाबदार आहेत. ही सवय मोडण्याची तुम्हाला परवानगी आहे पण तुम्ही ती मोडू शकत नाही. कारण त्या कृतीला आणि तिच्या परिणामांना तुम्ही जबाबदार असता. थोडक्यात सांगायचं झालं तर हे म्हणजे परळी खून (culpable homicide) आहे- अशी कृती ज्यामुळे मृत्यू होतो पण त्याला पूर्णपणे खुनाचा दर्जा दिला जात नाही.
मी अगदी ठळकपणे/ सहजपणे दिसून येईल अशा पद्धतीनी धर्माच्या विरोधात लिहिलं आहे. पण यामध्ये अजून खोल जाऊन पाहिलं तर हि गोष्ट लक्षात येईल कि, धर्म कोणताही असला तरी स्वतःच्या आदर्शांवर ठाम असणार्या माणसापेक्षा धर्मावर विश्वास न ठेवणारा माणूस जगासाठी कमी त्रासदायक ठरतो. बंडखोरपणामुळे कायम क्रांती घडली आहे. पण या दोन्हीच्या विरुद्ध जाऊन, जगण्याचा एक वेगळा मार्गही असू शकतो. यामध्ये मी तडफदारपणे इतरांसारखं वागणं नाकारत नाही तर एक अशी व्यक्ती बनून राहू शकतो जो या दोघांच्या मध्ये आहे ज्याला नक्की काय म्हणतात हे कोणालाच माहित नाही.
अशी कोणतीही गोष्ट जी आपण आजपर्यंत वाचलेल्या धार्मिक किंवा पारंपारिक साहित्याच्या चौकटीमध्ये बसत नाही, जिला शतकानुशतकं कोणी विरोध केला नाही, तिला आपण चूक ठरवून टाकतो. आपल्याला शिकवलेल्या या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून समजून न घेणं यातून त्या गोष्टींची मर्यादित कार्यशक्ती दिसून येते. एखादी गोष्ट बोलणारी आणि त्यावर विश्वास ठेवणारी कितीतरी लाख लोकं असू शकतात आणि त्याच्या विरोधात जाणारा कोणीतरी एकच असू शकतो. पण तरीही त्या दोघांपैकी कोणीच चूक किंवा बरोबर ठरत नाही. आकडा फक्त मोजू शकतो पात्रता ठरवू शकत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं.
मी हे जगातल्या अशा शिक्षित लोकांसाठी लिहितो आहे जे स्वतःला त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर अशा लोकांपेक्षा वेगळे समजतात ज्यांना दुर्दैवानी छापील शब्दांशी मैत्री करता आली नाही. हे अशा सुशिक्षित मनांसाठी आहे जे चांगल्या वाईटाची पारख फक्त त्यांच्या अभ्यासाच्या व्याप्तीवरून करतात. हे अशा सुजाण डोक्यांसाठी आहे ज्यांना एखाद्या कृतीमागची विचार प्रक्रिया तर समजते पण त्या मागचं मूळ कारण समजून घेण्यात त्यांचा दारूण पराभव होतो.
मानव जातीचा हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे की, सगळे लोक आपल्याहून वेगळ्या आणि न दिसणाऱ्या अशा एखाद्या शक्तीला शरण जाणं खूप चांगल्या पद्धतीनी शिकतात पण तेच, स्वतःच्या अस्तित्वात स्वतःला स्वतंत्र करायला कमी पडतात. लोकांना कधी अस्तित्ववाद कळलाच नाही. आपण देवांमधून त्यांचं देवपण काढलं तर फक्त अस्तित्ववादच उरतो. बुद्धांनी केलेल्या कार्यासाठी (त्यांच्या स्वत्वाच्या प्रकटीकरणासाठी) त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली त्तर येशू ला त्याच्या कार्यासाठी क्रॉसवर खिळे ठोकून मारण्यात आलं. भगवान महावीरांना काठ्या आणि दगडांनी मारण्यात आलं तर सोक्राटीसला त्याच्या स्वत्वाचे पालन करण्यासाठी विष देण्यात आलं.
लोकांना स्वतंत्र असू द्या. त्यांची मनं स्वतंत्र असू द्या. त्यांचे विचार स्वतंत्र असू द्या. त्यांचं प्रेम, त्यांची स्वप्नं स्वतंत्र असू द्या. त्यांचं अस्तित्व स्वतंत्र असू द्या. कारण स्वतंत्रतेत अस्तित्वाचा पाया आहे. स्वतंत्रतेत आजचा आनंद आहे, उद्याच्या आशा आहेत आणि फक्त स्वातंत्र्यातच माणूस स्वतःहून ‘असू’ शकतो आणि काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतो.
लोकांना निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असू द्या. त्याहीपेक्षा जास्त, लोकांना निर्णय न घेण्याचेही स्वातंत्र्य असू द्या. ‘काहीतरी करणं’ हे निव्वळ ‘असण्याच्या’ शक्तीपुढे कायम अर्थहीन ठरतं. ज्याला गायचं आहे त्याच्यासाठी आवाज महत्वाचा नसून त्याला गाण्याचं स्वातंत्र्य मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. त्त्याचं फक्त असणंच पुरेसं असू द्या. असं एक स्वतंत्र जग बनवण्यासाठी सामाजिक चौकटी गळून पडायला हव्यात. मानवाला आजपर्यंत उमगले आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त कंगोरे मानवतेला आहेत. कदाचित आपल्याला निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य नसू शकतं पण ते आहे अशी स्वातंत्र्याची किमान कल्पना तरी आपण रुजवू शकतो. हा शोध कदाचित आधुनिक जगातील न संपणारा गोंधळ थांबवू शकणार नाही पण मानवजातीला आपल्याच जमातीविषयी कमी होत जाणार्या करुणेपासून नक्की वाचवू शकतो. आजपर्यंत इतरांचं अस्तित्व मान्य करणे हा एकमेव मानवाच्या प्रगतीचा मार्ग राहिला आहे. आणि हे असणं म्हणजे आपल्याला या समाजानी भासवून दिलेल्या गोष्टींपेक्षा खूप जास्त काहीतरी आहे.
मला इथे गुरु नानकांचा शिष्य असलेल्या मर्दाना या मुस्लीम संगीतकाराची आठवण येते. मर्दाना मृत्युशय्येवर असताना नानकांनी त्याला विचारलं, “प्रसिद्ध होण्यासाठी तू मेल्यानंतर तुझं थडगं बांधायची तुला इच्छा आहे का?” त्यावर मर्दानानी उत्तर दिलं, “तुम्ही मला माझं आक्खं आयुष्य मुक्त राहू दिलंत, मग आता तुम्हाला मला बांधून का ठेवायचं आहे?”
हा लेख त्यांच्यासाठी आहे जे म्हणतात कि समाज अशा रीतीनी चालत नाही. बरोबर आहे, तो असा चालत नाही कारण तुम्ही तसे चालत नाही. शेवटी आपणच समाज आहोत.
एक वेगळी विचारधारा, की जी खरे तर आपल्या जीवनाचा मूलमंत्र असायला हवा. पण नेमके याच्या विरोधाचे बाळकडूच आपल्याला लहानपणापासून भरविले जाते. ‘मुलीच्या जातीने असे करू अथवा वागू नये’ हा संवाद तर अगदी घराघरात बोलला जातो. मुलींच्या स्वातंत्र्याची गळचेपी तर आईपासूनच सुरू होते. कारण एकच, तिच्या लहानपणी तिलाही हेच बाळकडू मिळाले असते. यात आई सुशिक्षित वा अशिक्षित असण्याचा प्रश्नच उद्बभवत नाही. एखाद्या मुलीच्या आयुष्याचा प्रवास पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता आईच्या या दोन वाक्यात असते.
स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास व इतरांनाही त्याच तराजूत तोलण्याची वृत्तीच पुढे माणसाला अंधश्रद्धाळू बनविते. उगाच नाही, गणेशोत्सवात एखाद्या “राजा” ला बघण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे राहतात आणि एखादा सेलेब्रिटी पाच मिनिटात दर्शन घेऊन कृतकृत्य होतो. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभ्या असणार्यांचा खोळंबा करून आपण फार मोठे पुण्य कमावले असे समजणाऱ्यांची कीव करावी तेवढी थोडीच!
असो, ही विचारधारा, हे असणं, हे मनामनात बिंबायला हवं. पण समाज कोवळी मनं कुरतडून त्यावर रुढींचा पगडा इतका घट्ट बसवतो की त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. आणि मग हेच उच्चविद्याविभूषित आणि उच्चतारांकित लोक समाजाचा स्वतंत्र अभिव्यक्तीचा पाया खणून काढण्यासाठी कुदळ फावडी घेऊन कामाला लागतात.
तुझ्या या लेखाद्वारे काही प्रमाणात जरी समाजप्रबोधन झाले तरी या लेखाची पूर्तता झाली असे समजायला हरकत नसावी!
शुभेच्छा!